मुंबई: दिल्लीत सुरू असलेल्या क्रॉक्रोज जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. आंदोलनाचा परिणाम राज्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय बंगल्यावर जास्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वर्षा बंगल्याकडे जाणार्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून वाहनांची आणि संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे. परिसरात पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा देखील वाढविण्यात आली असून, इतर काही मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या निवासस्थानीही अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मंत्रालय परिसरातही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून प्रवेशद्वारांवर तपासणीची तीव्रता वाढविण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्याही संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले.देशातील विविध राज्यांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा वाढविली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, आणि नागपूर सारख्या मोठया शहरात हा बंदोबस्त जास्त प्रमाणात ठेवण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले.
पोलिसांकडून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, गुप्तचर यंत्रणांमार्फत परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वन नेशन वन इमोशन मोर्चा आयोजित केला आहे.
रविवारी ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिध्दीविनायक मोर्चो आयोजित केला आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनांच्या जागेवर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.सध्या राज्यात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. ही सर्व उपाययोजना केवळ प्रतिबंधात्मक आणि खबरदारीचा भाग असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. परिस्थितीनुसार पुढील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.